यासीन शिकलकर अकलुज
माढा लोकसभा कोअर कमिटीची बैठक दूरदृष्टी प्रणाली द्वारे झाली तेंव्हा विधानपरिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी मराठा व धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नावर केंद्र सरकारने मध्यस्थी करून सदर आरक्षण द्यावे अशी आग्रही मागणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचेकडे केल्यानंतर पंडरपुरातील महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी, ‘‘प्रशांत परिचारकांना आदिवासी महादेव कोळी समाजाचा विसर पडला काय? असा प्रश्न उपस्थित करत केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांना परिचारकांनी मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्न सोडवण्याची विनंती करताना आदिवासी महादेव कोळी समाजाचे प्रश्न सोडविण्याचे सुचले नसल्याबाबत खंत व्यक्त केली.
माढा लोकसभा कोर कमिटीची बैठक दूरदृष्टी प्रणाली द्वारे आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये प्रशांतराव परिचारक यांनी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी याबैठकीस उपस्थित असलेले खासदार मा.रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ.रणजितसिंह मोहिते पाटील, आ.जयकुमार गोरे, आ.राम सातपुते, आदी मान्यवर यांनी आरक्षण प्रश्नावर दुजोरा दिला. परंतु गेल्या वीस दिवसांपासुन जळगावमध्ये जातीच्या दाखल्याच्या मागणीसाठी आमचा आदिवासी महादेव कोळी जमातबांधव आमरण उपोषणास बसलाय, याचा उल्लेख या बैठकीत का झाला नाही? आमच्या समाजाचा वापर फक्त मतासाठी करत का? तुमचा आम्ही जाहीर निषेध करतो. आदिवासी महादेव कोळी समाज हा पंढरपुर-मंगळवेढा तालुक्यात बहुसंख्येने असुन आमचे 40 हजार मतदान आहे! आमच्या समाजाचे मतदान प्रत्येक मतदारसंघात निर्णायक आहे, जिल्ह्यातील सर्व खासदार व आमदारांना विनंती आहे की, आपण आमच्या जातीच्या दाखल्यासाठी राज्यशासनाकडे पत्रव्यवहार करुन पाठपुरावा करावा, कारण आम्ही जिरे, मोहरी, कडीपत्त्यासारखे आहोत, आमच्याशिवाय तुमच्या राजकारणाला खमंग फोडणी मिळणार नाही! एवढे लक्षात ठेवा!! अशी प्रतिक्रिया गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिलीय.
ज्याप्रमाणे मराठा व धनगर समाज आरक्षणासाठी लढा देतोय त्याचप्रमाणे आम्ही सुध्दा गेल्या कित्येक वर्षांपासुन जातीच्या दाखल्यासाठी लढा देतोय, यासाठी विविध प्रकारची आंदोलनं आम्ही केली, आजही आमची आंदोलनं सुरु आहेत, कार्तिकी वारीला आमचा प्रश्न सोडल्याशिवाय कोणत्याच मंत्र्याने येऊ नये असा इशारा आम्ही सर्वात आधी दिलाय, परंतु आमची दखल कोणताही राजकीय नेता घेत नाही, याचा अर्थ काय होतो? आमच्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार, खासदार व मंत्रीमंडळाकडं वेळ नाही का? आमच्या भावनांची यांना कदर नाही का? असे अनेक प्रश्न उपस्थित करत गणेश अंकुशराव यांनी सर्वच राजकीय नेत्यांविरुध्द तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पंढरपुरचे तत्कालीन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी त्यांच्या कार्यकालात आम्हा आदिवासी महादेव कोळी जमातीला जातीचे दाखले दिले होते, परंतु अचानक हे दाखले देणे बंद का झाले? एका भावाला जातीचा दाखला मिळतो तर त्याच्याच दुसर्या सख्ख्या भावाला जातीचा दाखला मिळत नाही, बापाला जातीचा दाखला मिळतो पण पोराला मिळत नाही? हे कोणत्या कायद्यात बसतं? यामागे कुणाचा अदृश्य हात आहे? हे आम्ही शोधुन काढु आणि आमच्या समाजावर अन्याय करणारांना योग्य वेळी त्यांची योग्य जागा दाखवु असा इशाराही यावेळी गणेश अंकुशराव यांनी दिला आहे. लवकरात लवकर आमच्या जातीच्या दाखल्यांचा प्रश्न राज्यशासनाने केंद्र सरकारकडे वरील मुद्दे मांडुन पटवुन देऊन त्वरीत सोडवावा अशी विनंतीही यावेळी गणेश अंकुशराव यांनी केली आहे.